लढाईच्या अंतिम क्षणी
संसाराचा कोष तोडून
सामान्यच असामान्य होतात
लढाई जिंकतात,
आणि पुन्हा कोषात जाऊन
सामान्य होतात.
विजयाची मिरवणूक
ते परस्थपणाने
आपल्या घराच्या
खिडक्यांतूनच पाहतात.
********
माणसाच्या माथ्यावर दारिद्र्यासारखा
शाप नाही,
पृथ्वीच्या पाठीवर इतके अमंगल
इतके दुःखदायक, इतके भेसूर
दुसरे पाप नाही.
********
आकाशतळी फुललेली
मातीतील एक कहाणी
क्षण मावळतीचा येता
डोळ्यात कशाला पाणी?
********
चिंब चिंब भिजतो आहे
भिजता भिजता मातीमध्ये
पुन्हा एकदा रुजतो आहे.
********
आणि लक्षात ठेव
हा खेळ आहे,
खेळाच्याच नियमांनी
बांधलेला
निर्मळ बिलोरी आनंदात सांधलेला.
आघात करायचा, पण
रक्त काढायचं नाही
जीव ओतायचा
पण जीवन हरपायचं नाही…
आणि आपल्या अंतरंगातील पंच,
तटस्थ समयसुज्ञ साक्षी
थांबा म्हणतील त्या क्षणी थांबायचं
आणि जवळ जमलेले
चंद्राचे तुकडे घेऊन
आपापल्या अंधारात विलीन व्हायचं.
********
उषा सुंदर होतीच
पण अधिक सुंदर आहे
ही संध्या.
मावळतीवर उतरलेला हा सूर्य,
दिवसभराच्या प्रकाशदानाने कृतार्थ झालेला
अधिक प्रकाशमय अधिक स्नेहशीलही.
********
शब्द… जीवनाची अपत्ये
मृत्यूपर्यंत पोहोचत नाहीत.
म्हणून तुझ्या समाधीवर
मी वाहात आहे
माझे मौन.
********