सहज फुलू द्यावे फूल,सहज दरवळावा वास
अधिक काही मिळविण्याचा करू नये अट्टाहास
सुवास-पाकळ्या-पराग-देठ, फूल इतकीच देते ग्वाही
अलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही.

थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहजखूण
सुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यावा उकलून
मुखवटाही असेल, असो… मागले काहीच नये दिसू
साधे शब्द, पुरेत तेच, एक साधे सोपे हसू…

शान्ता ज. शेळके