गम्मत अशी आहे, की अनुभव, अनुभूती आणि काव्यानुभूती या तीन शब्दांमध्येच गडबड होत आहे. श्रावणाचा उल्लेख असेल, कलत्या छायांचा उल्लेख असेल, निळ्यासावळ्या भुईचा उल्लेख असेल, कवीने केलेले हे सर्व उल्लेख आपण अनुभव या सर्वसाधारण शब्दाने घेतो. ती अनुभूती आहे, अनुभव नाही. अनुभव सर्वसामान्यांचा असतो. त्या अनुभवांमध्ये काहीतरी सौंदर्याच्या रहस्याची जाणीव होणे हे अनुभूतीचे कार्य आहे. कदाचित तिथूनच कवितेचा प्रांत सुरू होत असावा. आणि ज्या वेळी कवितेच्या अनुभवाचे परमोच्च असे स्थळ किंवा पाझरणीचे जालतीर्थ आपल्याला गवसते त्याला आपण सौन्दर्यानुभूती म्हणतो. अनुभवांपासून प्रारंभ केला पण तिथेच थांबलात तर कवितेचे कोणतेच रहस्य आपल्याला कधीच उलगडू शकणार नाही. आणि तिथून हे आम्हाला समजत नाही, ते आम्हाला समजत नाही, अशा गोष्टी आपण ऐकतो. सौन्दर्यानुभूतीचा अर्थ शोधण्याची प्रक्रिया अनुभवाचा अर्थ शोधण्याच्या प्रक्रियेपेक्षा संपूर्णपणे भिन्न असल्याने अनुभवाच्या अनुभूतीचे, सौंदर्याचे तुमचे जे काही निकष असतील ते सौन्दर्यानुभूतीला लागू पडत नाहीत. अनुभवाच्या अनुभूतीचे निकष हे तात्कालिक व प्रचारकी असतात. उद्गारवाचक कविता, वक्तृत्वपूर्ण कविता ही संमेलनातील टाळीच्या अपेक्षेने उसळणारी कविता आहे. तिला हे निकष तंतोतंत लागू होतात.

— कवी ग्रेस.