लेनिनबाबा ….
तुझ्या बद्दल अजिबात वाचलेलं नाही
नाही म्हणायला कॉलेजात ऐकलंय म्हणा थोडं थोडं
अन् ‘लिहितोय वेडा’ म्हणून मला हसू बिसू नको
तुझ्या हसण्याचे दिवस सरलेत केव्हाच.
एक बाई तुझा इतिहास तावातावानं शिकवीत होती
लाल चौकात तुझ्या पुतळ्याखाली तरुण पोरं नाचत होती
कॉलेजातल्या इतिहासात तु आजही भले हीरो असशील
रशियातला वर्तमान तुला तुडवतोय
त्याचं काय ?
सारं जग साम्यवादी करण्याची
स्वप्न पाहणारी मंडळी.
तियानमेन चौकातले तांडव
तुमच्या लालभाईंचीच मर्दुमकी
होय ना ?
भांडवलशाही विरुद्ध तुमच्या नावानं
इथेही उठलेत कैक आवाज.
तिकडं पाऊस पडला म्हणून
छत्र्या उघडल्या गेल्या इथंही
पण साम्यवादी भांडवलदारांची
बोली बदलते आहे आज!
लेनिन मार्क्सच्या जागी विवेकानंद बसवले जाताय
त्याचं काय ?
लेनिनबाबा,
राजसत्ता उलथवणं तितकं कठीण नाही
नाही कठीण पोतंभर पुस्तकांच्या भेंडोळ्या लिहिता येणं
इथं माणूस बदलवता बदलवता
माणसातल्या ‘बर्लिन भिंती’ विरघळताय
रोजच्या रोज….
इथं माणसातलं राष्ट्र जागवता जागवता
कित्येकांचा कापूर होतोय
रोजच्या रोज….
—विवेक राम कवठेकर