मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राष्ट्र भाषा नसे,
नसे बाह्य ऐश्वर्य या माऊलीला,
यशाची पुढे थोर आशा असे.
न मातब्बरी पंचखंडांतरी ती
जरी मान्यता पावली इंग्रजी
भिकारीण आई जहाली म्हणूनी
कुशीचा तिच्या तीस केवी त्यजी.
जरी मान्यता आज हिंदीस देई
उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी
दिलाचा मराठा मराठीस वंदी
हिची जाणुनी योग्यता थोरवी.
असो दूर पेशावरी उत्तरी तो,
असो दख्खनी दूर तंजावरी
मराठीच माझी म्हणे मायबोली
प्रतिष्ठापुनी मूर्ति अभ्यंतरी!
मराठी असे आमुची मायबोली
जरी भिन्नधर्मानुयायी असू,
सहिष्णुत्व अंगी पुरे बाणलेले
हिच्या एक ताटात आम्ही बसू.
हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू ,
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे,
हिला बैसवू वैभवाचे शिरी!
—माधव ज्युलियन