दिवा असाच राहु दे
दिवा असाच राहु दे तुला निवांत पाहु दे
तपःश्रियेत गे तुझ्या मला उदंड न्हाऊ दे
व्यथा पिकून गे तुझ्या मुखी सुखे विसावल्या
कथा बनून कोवळ्या रसावुनी मुसावल्या
ऋतू सहाहि ढाळिती किती नव्या नव्या कळा
जरेत आगळ्या तुझ्या अपूर्व गंधसोहळा!
कधी कधी मनास ये उदास एकटेपणा
चराचरीहि जाणवे जुनाट तोच तो पणा
चुकून ये कुणीतरी मुलेही दूर पांगली
दुरावलीत माणसे जरी मुळात चांगली
असह्य एकटेपणी तुझीच ओढ लागते
पुनश्च मर्गळीतही प्रसन्न ज्योत जागते
तुझीच साथ राहिली भरून जीव लाहु दे
सरून रात्र जाऊ दे पुन्हा पहाट होऊ दे
—बा.भ.बोरकर