तू करुणाकर, तूच चराचर
व्यापुनी उरला दशांगुळे
तू अविनाशी, विघ्नविनाशी
तू तेजाची सूर्यकुळे!

कृष्ण घनांतुन तुझीच नुपुरे
पाऊसकाळी छुमछुमती
मातीमधुनी तुझ्या रुपाची
रोपे हासत अवतरती!

तूच जिवाच्या गाभाऱ्यातील
निजबोधाची निरांजने
भवतापातून तूच काढिसी
त्रिगुण युतीची दास मनें!

तूच निवारा अमृतधारा
परीसस्पर्श तू आत्मसखा
तूच माउली, मोक्षसावली
तुझी दर्शने देत सुखा!

शिवा राऊत