सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही माशाची मग भागात नाही तहान 
 
स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप 
वाटी-वाटीने ओतलं तरी कमीच पडते तूप 
 
बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ 
पैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागू नका वेळ 
 
करिअर होतं जीवन मात्र, जगायचं जमेना तंत्र 
बापाची ओळख मुलं सांगती, पैसा छापायचं यंत्र 
 
चुकून सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुणा स्वतःच्याच घरी 
दोन दिवस कौतुक होतं नंतर डोकेदुखी सारी 
 
मुलंच मग विचारू लागतात बाबा अजून कां हो घरी?
त्यांचाही दोष नसतो, त्यांना सवयच नसते मुळी!
 
क्षणिक औदासिन्य येतं, मात्र पुन्हा सुरु होतं चक्र 
करिअर, करिअर दळण दळता, स्वास्थ्य होतं वक्र 
 
सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती चढलेल्या 
आतून मात्र मातीच्या भिंती, कधीही न सारवलेल्या 
 
आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवूं लागतं कांही 
धावण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही 
 
सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं 
सुखाची तहान भागता भागता समाधान दूर राहून गेलं 
 
-अज्ञात