जगायचे जर असेल तर, मग
गळ्यात गाणे हवे
रंग पराभूत स्वप्नांनाही
देता यावे नवे….
रक्त संपल्या हातांनाही
वळता याव्या मुठी
अभेद्य अंधाराला देखील
असतील कोठे फटी….
जगणे तितके खोल असावे
दुःख जेवढे जुने
ओठ दाबुनी हसतील त्यांची
फुलतील श्रावण उन्हे.
सहवासाला सुगंध येईल
उरांत जपता कळी
अन् स्वातीचे घडेल वैभव
डोळ्यांमधल्या जळी.
जरी दुःखाचा गर्भवारसा
तरी जगावे असे
अपुल्या दुःखांसोबत घ्यावे
इतरांचे ही वसे.
–प्रसन्न शेंबेकर