कशी फुटली कपाशी हसे चांदणं दुपारी
वेचतांना वेळ नाही खांड खायला सुपारी!

भुतासारखं वेचून शिणले ना नखं बोटं
सायंकाळी मोजणार दांडी मारणार नीट!

ढीग डोंगरा एवढा किती सांगायच्या खंडी?
फेस यायचा बैलास ओढतांना गाडी बंडी!

भिजे दुधाच्या धारेत शुभ्र पांढरा कापूस
मऊ सुताचं लुगडं नेसू जीवास उल्हास.

कर्जपाणी फिटायचं उरल्याचं तेलमीठ
जाय वर्षावर पुन्हा नव्या लुगड्याची गोठ.

आता दांडीच्या नेसूला पुन्हा मारायची गाठ
मेला कापूस हिणवी शुभ्र विचकून दात.

विठ्ठल वाघ
त.भा.दि.-९८