महाराज शिवछत्रपती म्हणजे लोकांचे राजे. सर्व थरातील लोकांची मने पेटवून उठविली महाराजांनीच. ज्वालामुखीच्या बळाने सह्याद्रीही खवळून उठला अन् साडेतीनशे वर्षे इथे कोंदलेला कभिन्न अंधार संपला. गुलामगिरी संपली, वर्मावरच्या वेदना संपल्या. संतसज्जनांचे मायबहिणींचे आणि या भूमीचे सारे अपमान धुवून निघाले.
महाराजांनी आणि त्यांच्या जीवलगांनी देव मस्तकी धरून क्रांतीचा हलकल्लोळ केला. येथे स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले. रायगडावर सार्वभौम सिंहासन छत्रचामरांसकट प्रकटले. चार पातशाह्या दबावून राजे छत्रपति झाले. गोष्ट सामान्य न जाहली. अपरंपार प्रेम करावयास आणि हक्काने रुसावयास लोकांस जागा निर्माण झाली.
महाराजांनी सामान्य जनांना सांगाती घेऊन असामान्य इतिहास निर्माण केला. अपार कष्टातून आणि असामान्य त्यागातून हा इतिहास उगवला, फुलला. इतिहास नेहमीच उगवतो रक्ताच्या थेंबातून, अन् फुलतो घामाच्या थेंबातून; अत्तराच्या वा गुलाबपाण्याच्या थेंबातून नव्हे.
महाराजांनी अभेद्य गडकोट निर्माण केले. अजिंक्य आरमार निर्माण केले. तुडुंब भरलेली धान्य कोठारे अन् अपार द्रव्याची भांडारे निर्माण केली. अजिंक्य तोफाही निर्माण केल्या. पण त्यांनी निर्माण केली सर्वात अवघड परंतु सर्वात आवश्यक अशी गोष्ट. कोणती ? त्यांनी अजिंक्य मनाची माणसे निर्माण केली. अजिंक्य मनाची माणसे निर्माण झाली की अवघे राष्ट्रच अजिंक्य बनते.
छत्रपति शिवराय म्हणजे जागत्या राजकारणाचा, प्रखर स्वाभिमानाचा, डोळस, श्रद्धेचा, उदात्त संस्कृतीचा, कठोर व्यवहारदक्षतेचा, अचूक नेतृत्वाचा, राष्ट्रीय चारित्र्याचा आणि पार्थ पराक्रमाचा मूर्तिमंत साक्षात्कार. शिवचरित्र म्हणजे सिद्ध झालेले राष्ट्र उभारणीचे तत्त्वज्ञान.
या तत्त्वज्ञानाचे आणि इतिहासाचे आम्ही औरस वारस. त्या इतिहासास, तत्त्वज्ञानास, सिंहासनास आणि सिंहासनाधीश्वर क्षत्रियकुलावतंस राजा शिवछत्रपती महाराजांस आमचा त्रिवार मुजरा !