माझ्याच गोष्टीतली मी एक मुलगी

आईबाबांचा मुलगा म्हणून वाढणारी
मुलींच्या जगण्यातले सगळे नियम मोडणारी
किरण बेदी, अमृता, तस्लिमा यांचं
विद्रोहाचं बीज स्वतःमध्ये रुजवून घ्यावं
माझ्यासारख्या मुलीने आईबाबांचा आधार व्हावं
स्वतःच्या नव्या अस्तित्वासह जगत होती
स्त्री-पुरुष समानतेचं स्वप्न बघत होती 

पण कधीतरी नकळत
कळकट्ट नजरा, अन जहरी स्पर्श छळू लागले
हळव्या भाषेपलीकडचे निराळेच अर्थ कळू लागले
मग जाणवायला लागलं
शास्त्र, निसर्ग, व्याकरण
कुठेच सामान नसतात तो-ती
असतात फक्त नर-मादी
खरं म्हणजे मी विसरलेच होते.. मी एक स्त्री
अन आजूबाजूंच्या माणसांमध्ये पुरुष,
माणूस म्हणून जगण्याचा कंटाळा आला की कधीही पुरुष होणारा…
स्टॅण्डवर, कॉलेजमध्ये, बस किंवा मंदिरापुढच्या रांगेतही
 
मग अंगवळणी पडलेलं जगणं मोडतांना,
समजूत घातली स्वतःचीच
तशी बरीच स्वतंत्र आहे की
समारंभापुरते कां असेना, माझे विचार मांडू शकते
चित्रपटापुरते का असेना, बिनधास्त वागू शकते
माझ्यासारख्या कितीतरी आणि मीही
लढतो आहोत स्वतःतल्या बंडखोर मुलीशी
मृत्यूच्या चाहुलीनं श्वासच रोखून धरावा तसं….
 
फक्त एकाच आशेवर
उद्याच्या सुंदर जगाचं आकाश
माझ्या मुलीचं असेल….
ही मुलींची गोष्ट, माझ्या मुलीची नसेल.
कधीच नसेल…
 
– अभिव्यक्ती पाटील