मनांत आठवणी गर्दी करतात…

मनांत आठवणी गर्दी करतात
तेव्हा हसतमुखानं त्यांना या म्हणावं,
उंच मखमली आसन देऊन
प्रेमाने त्यांना बसा म्हणावं.
स्थानापन्न झाल्या की
हळूच विचारावं,’काय घेणार ?’
त्याही बेट्या मिश्किल
मिश्किल पणाचा आव आणूनत्याही विचारतील ,
‘काय देणार?’
मोकळेपणानं उत्तर द्यावं
मागाल ते तुमचंच.
मग हळूच एक म्हणेल डोळे द्या,
पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे.
दुसरी म्हणेल हात द्या
न धरता आम्हाला पकडून ठेवणारे.
तिसरी म्हणेल शब्द द्या
इंद्रधनुष्यातील रंग आमच्यावर उधळणारे.
चौथी,पाचवी सगळ्या होतील पुढे
पण कुणालाही कांहीच देऊ नये.
फक्त मध भरल्या गळ्यानं नुसतच हुं म्हणावं
डोळे मिटून घ्यावे
आणि सगळ्यांना कुरवाळत कुरवाळत
मनाच्या तळमहालांत झोपवून टाकावं
पुन्हा अशीच गर्दी करण्यासाठी.