तिसरा डोळा आम्ही नुसता किलकिला केला,
तर डळमळून गेले अवघे भूमंडळ.
सत्तांध गिधाडांनी केवढा थयथयाट केला
जसे कांही घडूनच गेले भयानक अमंगळ !

त्यांना वाटते, कराल पंजाखाली आम्ही निमूट जगावे
फेकलेल्या चार तुकड्यांपुढे व्हावे कणाहीन लाचार.
अवतीभवतीची कोल्ही कुत्री भुंकतांना
भिऊन करावा आम्ही त्यांना बेशरम नमस्कार !

त्या धनदांडग्यांनी धमकी दिली आहे आता
आमचे रस्ते रोखण्याची प्रगतीसूर्य झाकण्याची.
हे जसे काही साळसूद रुद्राक्षांची जपमाळ ओढणारे
त्यांच्या भात्याला जणू रास नाजूक फुलांची !

लक्षात असू द्या,
इतिहासाने खूप शिकविले आहे.
गुढघे टेकून कुणाचेही भले होत नसते.
भीक घालीत नाही कुणी भेकडांच्या अहिंसेला.

लक्षात असू द्या,
गंगायामुनेच्या अथक प्रवाहामधून
आमच्या सहिष्णुतेचे वाहतेय शीतल जिवंत पाणी
तरीहि शांत रक्तामधून सळसळते आहे
कुरुक्षेत्रावरच्या श्रीकृष्णाची न्यायनिष्ठूर वाणी.

आपापसात असतील मतभेद तरी एक होऊ
समर्थ राष्ट्रासाठी आम्ही समर्पणसिद्ध होऊ
विश्वकल्याणाचे पसायदान तर
आम्हीच मागितले आहे
नाठाळासाठी तुकोबाची काठी
आम्हीच होऊ !