ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत.
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी गावीत.

सूर्यकुळाशी ज्यांचे नाते
त्यांनी थोडा प्रकाश द्यावा.
प्राक्तनाचा अंधार तिथे
प्रकाशाचा गांव न्यावा.

मन थोडे ओले करून
हिरवे हिरवे उगवून यावे
मन थोडे रसाळ करून
आतून मधुर मधुर व्हावे.

ज्यांच्या अंगणात ढग झुकले
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे.

आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
ज्यांचे जन्म मातीत मळले
त्यांना उचलून वरती घ्यावे.

दत्ता हलसगीकर