डोळ्यावरल्या गांधारीच्या
सतीत्व पट्ट्या सोड
काया न तुझी गौररुपाची
सर्वांगाला कोड.||१||

वटवृक्षांच्या पारंब्यासम
ध्यानस्थाचे सोंग
प्रपंचून घे दुःखे सारी
संसार नसे हे ढोंग ||२||

जळी, तळी, विहिरीकाठी
पाण्याचे संचित नसते
झर झर झरता झरता
गंगा भगीरथ होते ||३||

पडीत राहून वांझ महीची
विरागिनीची दैना
फाळामधुनी फुटुनि येता
सुखास जातो महिना ||४||

वणवणतांना रानामधुनि
पायी खुडु दे काटा
रक्त सांडता खाली थोडे
ऋतुहिरव्या होतील वाटा ||५||

गजेश तोंडरे