जात्यावारती दळता दळता सूर भरविले मला
मुसळाने तू कांडण केले आणि घडविले मला…
मला चढवता घाट सुखाचा कोसळली कैकदा
कधी मनाचे खचले गोपुर पण सावरली पुन्हा
दरी कपारी ठेचाळत तू उंच उचलले मला…
तू माझ्या कोरड्या बनाला दिला सुगीचा थवा
अंधाराच्या कुशीत झाली माझ्यासाठी दिवा
वळणावळणावर जखमांच्या तूच हसविले मला…
अजूनही आठवतो-‘गळक्या खोप्यामधला झुला’
अणु-रेणूच्या या तुकड्याला किती लावला लळा!
जणूं मांडीवर कृष्ण निजावा तसे झुलविले मला…
–बबन सराडकर
त.भा.दि.-९८